जालना : मराठा आंदोलनाचा चेहरा असलेले नेते मनोज जरांगेंवर पाळत ठेवली जाते आहे का? असा प्रश्न निर्माण होतो आहे. कारण मनोज जरांगेंच्या घरावर ड्रोनने घिरट्या घातल्याची चर्चा होते आहे. सोमवारी रात्री मनोज जरांगेंच्या घरावर ड्रोनने घिरट्या घातल्या असं गावकऱ्यांनी म्हटलं आहे. ड्रोनच्या मदतीने मनोज जरांगेंच्या घराची टेहळणी केली जाते आहे असं गावकऱ्यांनी म्हटलं आहे. सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह मराठा आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. त्यासाठी त्यांनी बेमुदत उपोषण सुरुही केलं होतं. मात्र त्यांनी ते मागे घेतलं आहे. आता त्यांनी आमच्या ममागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर विधानसभा निवडणुकीत एक एकेला नाव घेऊन पाडणार असल्याचं म्हटलं आहे. अशात एक ड्रोन त्यांच्या घराभोवती घिरट्या घालत असल्याची चर्चा आहे.

नेमका प्रकार काय घडला ?
सोमवारी मध्यरात्री एक ड्रोन कॅमेरा मनोज जरांगेंचा मुक्काम असलेल्या घराभोवती फिरत होता असं गावकऱ्यांनी म्हटलं आहे. यानंतर मनोज जरांगेंनी घराच्या टेरेसवर जाऊन पाहणी केली असंही गावकऱ्यांनी म्हटलं आहे. यानंतर त्यांनी सहकाऱ्यांशी चर्चाही केली. या प्रकाराबद्दल अंतरवाली सराटीचे सरपंच आणि ग्रामस्थांनी पोलिसांना तोंडी तक्रार दिली आहे. आता पोलीस घटनास्थळी येऊन पाहणी करण्याची शक्यता आहे. चार दिवसांपूर्वीच अंतरवाली सराटीत अशाचप्रकारे ड्रोन घिरट्या घालताना दिसून आल्याचंही गावकऱ्यांनी म्हटलं आहे