बौद्ध लेणी परिसरात राजकीय वरदहस्ताखाली डोंगर सपाटीकरणाचा धडाका; पर्यावरण धोक्यात !

बौद्ध लेणी परिसरात राजकीय वरदहस्ताखाली डोंगर सपाटीकरणाचा धडाका; पर्यावरण धोक्यात !

छ. संभाजीनगर ; छत्रपती संभाजीनगर जवळील पहाडसिंगपुरा परिसरात असलेल्या ऐतिहासिक बौद्ध लेणी परिसरात मोठ्या प्रमाणावर डोंगर सपाटीकरण सुरू असून, हे काम राजकीय वरदहस्तामुळे खुलेआम सुरु असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. महार इनाम व शासकीय गायरान जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण करून जेसीबी व पोकलेनच्या साह्याने डोंगर फोडून सपाटीकरण चालू आहे. हे काम रात्रीच्या वेळीही सुरु असून, यामागे मोठा राजकीय पाठिंबा असल्याचा संशय गावकऱ्यांमध्ये आहे. सदर परिसर हा निसर्ग रम्य आणि ऐतिहासिक असून, येथे वाहणारे धबधबे, ओढे आणि नैसर्गिक जलप्रवाह थेट खाम नदीपात्रात मिसळतात. परंतु सुरू असलेल्या अनधिकृत कामांमुळे या जलप्रवाहांवर मोठा परिणाम होतो आहे. सपाटीकरणामुळे जमिनीची नैसर्गिक रचना बदलत असून, पर्यावरणीय समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

हा परिसर जैवविविधतेने समृद्ध असून त्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाला कोणीतरी मोठ्या राजकीय नेत्याचा पाठिंबा असल्याने प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. भूमाफियांना “बिनधास्तपणे काम करा” असा आडून आश्रय दिला जातोय, अशी चर्चाही गावपातळीवर जोरात आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारी असूनही यंत्रणा निष्क्रिय असल्यामुळे भूमाफियांना अधिकच उधळलेपणाची संधी मिळते आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. निसर्ग, ऐतिहासिक वारसा आणि पर्यावरण यांचा ऱ्हास थांबवण्यासाठी लोकप्रतिनिधी, महसूल आणि वन विभाग यांनी संयुक्त कारवाई न केल्यास या परिसरात मोठे संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *