छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): जागतिक वारसा स्थळ असलेल्या बौद्ध लेणी परिसरात विनापरवानी स्फोटकांचा वापर करून करण्यात आलेल्या अवैध ब्लास्टिंगची खात्री पटली असून, याप्रकरणी संबंधित जमिनमालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रभारी अपर तहसीलदार डॉ. परेश चौधरी यांनी मंडळ अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच एफआयआरची प्रत अहवालासह सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. बुद्ध लेणीला हादरे, प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. खंडपीठाने यास ‘सुमोटो’ जनहित याचिकेच्या स्वरूपात स्वीकारून त्वरित चौकशीचे आदेश दिले. यानुसार नेमलेल्या संयुक्त समितीने मौजे हसूल येथील सर्व्हे नं. २३४ मध्ये सखोल पाहणी केली असता, कृत्रिमरित्या फोडलेले कणखर दगड व बारीक दगडाचे तुकडे आढळले. यावरून संबंधित मालकाने अवैधरित्या ब्लास्टिंग केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले.

प्रशासनाने जमिनमालकाला नोटीस बजावून खुलासा मागवला. मात्र, दिलेला खुलासा असमाधानकारक असल्याने तो नामंजूर करण्यात आला. याचबरोबर गट क्र. ४० आणि ३९ मध्येही जिलेटिनच्या वापराचे पुरावे आढळले असून, स्थानिकांनीही त्या भागात स्फोटाचे आवाज ऐकले असल्याचे सांगितले आहे. या प्रकारामुळे ऐतिहासिक बौद्ध लेणीला धोका निर्माण झाला असून, दोषींवर कठोर कारवाई करून वारसा वाचवावा, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.