संभाजीनगर (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगरच्या टोड पहाडसिंगपुरा परिसरातील गट क्रमांक 37 मध्ये गंभीर स्वरूपाच्या झाडांची अवैध कत्तल व अनधिकृत तीन मजली इमारत उभारणीचा प्रकार समोर आला आहे. स्थानिक रहिवासी संतोष सांडुजी भिंगारे यांच्या तक्रारीनुसार, सुनील भुसाळ नावाच्या व्यक्तीने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता परिसरातील झाडे तोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असून, त्याच ठिकाणी नगर नियोजन कायद्याचे उल्लंघन करत उंच इमारत उभारली आहे. या प्रकारामुळे बुद्ध लेणीसारख्या संवेदनशील परिसरातील हरित पट्टा व पर्यावरणाचा समतोल धोक्यात आला आहे.

या प्रकरणात महाराष्ट्र झाडांचे संरक्षण अधिनियम 1975, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 यांचा स्पष्ट भंग झालेला आहे. महानगरपालिकेच्या नियमानुसार २२ फूटांपेक्षा अधिक उंचीचे बांधकाम निषिद्ध असूनही याठिकाणी नियम मोडण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरात अशा गैरकायद्यांच्या प्रकारांविरोधात संतापाची भावना निर्माण झाली आहे. स्थानिकांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. या अनियमिततेवर महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे अधिकारी वाहुळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “सदर प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. झाडांची कत्तल व अनधिकृत बांधकाम हे दोन्ही गुन्हे असून संबंधितांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.

या परिसरातील कोणतीही बेकायदेशीर बांधकामे सहन केली जाणार नाहीत आणि लवकरच आवश्यक ती तोडक कारवाई केली जाईल.” त्यांनी स्पष्ट केलं की, या प्रकारामुळे पर्यावरण व नागरी व्यवस्थेवर विपरित परिणाम होतो, त्यामुळे तातडीने कार्यवाही अनिवार्य आहे. प्रशासनाकडून कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, वनविभाग व बांधकाम विभागालाही यासंदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिक व पर्यावरणप्रेमी संस्था आता प्रशासनाच्या पुढील कृतीकडे लक्ष ठेवून आहेत. यावर जर उदाहरणात्मक कारवाई झाली नाही, तर शहरात अशा प्रकारच्या बेकायदेशीर हालचालींना अधिकच चालना मिळू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.