छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध औरंगाबाद (बुद्ध) लेणी परिसराच्या केवळ तीन किलोमीटर अंतरावर, हसूल शिवारातील सर्वे नंबर २३४ मध्ये परवानगीविना स्फोटके वापरून डोंगर फोडल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जीवनलाल कुंदनलाल डोंगरे, पृथ्वीराज डोंगरे, प्रेमराज डोंगरे आणि हंसराज डोंगरे या चौघांवर बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून महसूल विभागाच्या पथकाने स्थळाची पाहणी केली. सुरुवातीला हा प्रकार पहाडसिंगपुरा शिवारात घडल्याचे समजले होते, मात्र तपासात तो हसूल शिवारातील असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, याठिकाणी ब्लास्टिंगसाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नव्हती. केवळ सपाटीकरणासाठी तहसील कार्यालयाकडून सामान्य परवानगी घेतल्याचे डोंगरे यांनी दाखवले.

घटनास्थळाजवळ अवघ्या १०० मीटर अंतरावर एक शाळा आणि मुख्य रस्त्यावर मोठी वर्दळ असून, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या कारवाईत जिल्हा खनिकर्म अधिकारी अनिल घनसावंत, अपर तहसीलदार डॉ. परेश चौधरी, मंडळ अधिकारी कल्याण वानखरे, तलाठी सूरज गिरी व गणेश सोनवणे यांच्या पथकाने बारकाईने तपास केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे ही घटना अधिकच गंभीर बनली असून, प्रशासनाने तत्काळ गुन्हा दाखल केला. मात्र स्थानिकांच्या मते, बुद्ध लेणीच्या अधिक जवळ असलेल्या गट क्र. ४० व ३९ मध्येही असाच अवैध ब्लास्टिंगचा प्रकार झाला असून, तिथेही मोठ्या प्रमाणात डोंगर फोडून सपाटीकरण करण्यात आले आहे. काही गटांमध्ये स्फोटांचे आवाज तसेच शिकारसदृश गोळीबाराचे आवाज ऐकले गेले. त्यामुळे “एका गटातील चौघांवरच गुन्हा दाखल आणि इतर दोषी सुटलेच कसे?” असा सवाल उपस्थित होत आहे. सर्व गटांवरील संबंधित मालकांवरही त्वरित गुन्हे दाखल करून कायद्याची समानता पाळावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने निवडक कारवाई न करता सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा जनआंदोलन अटळ असल्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.