बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेच्या बळकटीसाठी आणि पोलिस दलाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी पोलिसांच्या नेमप्लेटवरून आडनाव हटवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यापुढे बीड जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस कर्मचारी केवळ त्यांच्या नावाने ओळखला जाणार आहे. राज्यात पहिल्यांदाच असा निर्णय घेतला गेला आहे, ज्यामुळे पोलीस दलात जात, धर्म किंवा पार्श्वभूमीवरून होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला आळा बसणार आहे. अनेकदा लोक आडनावावरून पोलिसांविषयी वेगवेगळ्या कल्पना तयार करतात, त्यामुळे त्यांच्या कामावर परिणाम होऊ शकतो. मात्र, आता पोलिसांचे कामच त्यांची खरी ओळख ठरेल, अशी अपेक्षा आहे.

हा निर्णय केवळ पोलिस दलातील समतेचा संदेश देत नाही, तर नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास दृढ करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. बीडमधील या निर्णयानंतर संपूर्ण राज्यात याबाबत चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र पोलिस दलासाठी हा निर्णय एक नवा आदर्श ठरेल, अशी भावना व्यक्त होत आहे. “आता पोलिसांना आडनाव नाही, फक्त कर्तव्याची ओळख!”