बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात अर्धमसला गावातील मशिदीत मध्यरात्री स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जिलेटिनच्या कांड्या ठेवून हा स्फोट घडवण्यात आला, ज्यामुळे मशिदीच्या भिंतीला मोठा तडा गेला आणि जमिनीत खड्डा पडला. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ही घटना रमजान ईदच्या एक दिवस आधी घडल्याने गावात तणाव वाढला आहे. घटनेची माहिती मिळताच बीडचे पोलीस अधीक्षक आणि छत्रपती संभाजीनगरचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संपूर्ण घटनेचा पंचनामा केला आणि परिसराची व्हिडीओग्राफी करून तपास सुरू केला. गावात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, स्फोट घडवण्यापूर्वी विजय गव्हाणे याने सोशल मीडियावर जिलेटिनच्या कांड्यासह स्वतःचा व्हिडिओ पोस्ट केला होता.

त्याने हातात जिलेटिनच्या कांड्या आणि तोंडात सिगारेट घेऊन हा व्हिडिओ तयार केला होता, जो आता पोलिसांच्या तपासाचा महत्त्वाचा भाग बनला आहे.स्फोटानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.