छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : संभाजीनगर येथील सातारा पोलीस ठाणे व महानगरपालिका हद्दीतील सर्व्हे नं. 23 क्षेत्र 21 एकर 14 गुंठ्याच्या वादग्रस्त जागेवर कथितपणे फसवणूक करून बांधकाम परवानगी मिळवून दि. 08 एप्रिल 2025 रोजी दोन मजुरांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात पठाण ताजखॉ इनायतखॉ (प्रतिनिधी – दैनिक तुफान शहंशाह) यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त, उस्मानपुरा विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केली असून, त्यांनी या मृत्यू प्रकरणात कलम 302 अंतर्गत हत्या म्हणून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तक्रारदाराचा आरोप आहे की, बांधकाम क्षेत्रात सुरक्षा उपाययोजना न केल्याने मोठ्या आकाराचा खड्डा कोसळून मजुरांचा मृत्यू झाला. तसेच हे बांधकाम CAPITAL TRADE CENTRE या नावाखाली जाहिरात करून सुरू करण्यात आले असून प्रत्यक्षात बांधकाम परवानगी प्रफुल्ला अग्रवाल या कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर मिळाल्याचा आरोप आहे. त्यांनी महानगरपालिकेतील 11 अधिकाऱ्यांच्या संगनमताने व लाचखोरीच्या माध्यमातून परवानगी मिळवल्याचे तक्रारदाराने स्पष्ट केले आहे.


याबाबत पोलिसांनी खोटा FIR दाखल केला असून मृत्यूला नैसर्गिक दुर्घटना दर्शवले आहे. मात्र तक्रारदाराच्या मते, हे पूर्ण प्रकरण नियोजनबद्ध घातपात आहे आणि मजुरांची हत्या असून, त्यात संपूर्ण महानगरपालिका यंत्रणा, संबंधित अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर सहभागी आहेत. या प्रकरणात अद्याप कोणतीही पारदर्शक चौकशी करण्यात आलेली नाही, तसेच माहिती अधिकारातही उत्तरे न दिल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. तक्रारदाराने यापूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दि. 26 मे 2025 रोजी अमरण उपोषण सुरू केले होते, जे प्रशासनाच्या तोंडी विनंतीनंतर व लेखी आश्वासनानंतर दि. 28 मे रोजी मागे घेण्यात आले. आता त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन 13 व्यक्तींवर खुनाचा गुन्हा दाखल करून सक्षम चार्जशीट न्यायालयात सादर करण्याची मागणी सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानपुरा विभाग यांच्याकडे केली आहे. अन्यथा, ते उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल करणार असल्याचे तक्रारदाराने स्पष्ट केले आहे.
