बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी: दोघांवर गुन्हा दाखल..
छत्रपती संभाजीनगर : बँक व्यवस्थापकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. त्याचे व्हिडिओ बनवून बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ४० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (ता. १५) याबाबत वाहरनगर पोलिसांनी कारवाई केली. सिद्धार्थ ठोकळ आणि एका २६ वर्षीय महिलेचा आरोपींमध्ये समावेश आहे. ३७ वर्षीय फिर्यादी एका सरकारी बँकेत शाखा व्यवस्थापक आहेत. कर्ज प्रकरणाच्या फायली मंजूर करण्याचा त्यांना अधिकार असतो. सामाजिक कार्यकर्ता अशी ओळख करून दिलेल्या सिद्धार्थ ठोकळने त्यांच्याकडे कर्जाच्या ४० फायली नेल्या. वेगवेगळ्या त्रुटींमुळे व्यवस्थापकांनी त्या फायली फेटाळून लावल्या. त्यामुळे एके दिवशी ठोकळ एका महिलेला सोबत घेऊन आला. तिचा ब्यूटी पार्लरचा व्यवसाय असल्याचे सांगून बँक व्यवस्थापकासोबत तिची ओळख करून दिली. तिची दहा लाखांच्या कर्जाची फाइल मंजूर करण्याची विनंती केली. मात्र, कागदपत्रांची पडताळणी करून ही फाइलही फेटाळण्यात आली. त्यानंतर सिद्धार्थ ठोकळने बँकेत येऊन व्यवस्थापकाला धमकावले. बघून घेतो, असा दम देऊन तो निघून गेला होता. व्यवस्थापकाने कर्ज प्रकरण फेटाळल्यानंतर आरोपी महिलेने सतत फोन करून आणि मेसेज करून व्यवस्थापकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. वेगवेगळ्या हॉटेल, लॉज आणि फार्म हाउसवर नेऊन त्याच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. त्याचे चित्रीकरण करून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्याच्याकडे ४० लाखांची खंडणी मागितली. ठोकळने तर ४० लाख रोकड आणि कर्जाच्या ४० फायली मंजूर करण्यासाठी ब्लॅकमेल करणे सुरू केले. तुझे जीवन उद्ध्वस्त करू, अशा धमक्या दिल्या. तसेच, व्यवस्थापकाच्या घरी जाऊन प्रत्येकी २० लाखांचे दोन धनादेशही घेतले. महिलेच्या प्रकरणात अडकल्यामुळे बँक व्यवस्थापक तणावात होता. त्याच्या डोक्यात वेगवेगळे विचार येत होते. मात्र, फायली मंजूर न केल्यामुळे आरोपी ठोकळने आपल्याला या प्रकरणात अडकविले, असे लक्षात आल्यावर त्याने तत्काळ जवाहरनगर ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

पोलिसांनी सापळा रचला, पण आरोपी पसार
पोलिस निरीक्षक सूरज बंडगर, उपनिरीक्षक मारोती खिल्लारे यांनी सापळा रचला. बँक व्यवस्थापकाला सर्वकाही समजावून सांगितले. ५० हजार रुपयांच्या खऱ्या आणि इतर बनावट नोटांचे बंडल बनवून दिले. आरोपींनी सुरवातीला मुकुंदवाडी सिग्नल येथे बोलावले, पण पोलिस मागावर असल्याचे लक्षात येताच विठ्ठलनगर, पुढे रामनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी बोलावले. अखेर, फिर्यादी माघारी निघाल्यावर आरोपींनीच सिडको चौकात त्यांना रोखून पैशांची मागणी केली. भांबावलेल्या व्यवस्थापकाने कारमधूनच पैशांची बॅग त्यांच्या हवाली केली. बॅग घेऊन आरोपी दुचाकीने पळून गेले. पोलिसांनी पाठलाग केला मात्र आरोपी हाती लागले नाहीत.