छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) : बुद्ध लेणी रोड, हनुमान टेकडी, पहाडसिंगपुरा येथील रहिवासी संतोष सांडुजी भिगारे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात सादर केलेल्या निवेदनाद्वारे, बुद्धलेणी रोडवरील गट / सर्वे क्र. ३९, ४०, ४०/१, ४०/२ आणि ४०/३ क्रमांकाच्या पिढीजात पट्टेदार (महार इनाम) जमिनीवरील आपल्या कुटुंबाचा हक्क अधोरेखित केला आहे. फजली सन १३४४ पासून त्यांच्या कुटुंबाचे या जमिनीवर वास्तव्य आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. भिगारे यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, त्यांच्या कुटुंबाने आजवर कोणत्याही शासकीय अथवा खासगी व्यक्तीच्या हक्कांवर गदा आणलेली नाही. मात्र, सरकारी योजनांतून मदत मिळाल्यानंतरही प्रत्यक्ष जमिनीचा ताबा अद्याप अधिकृतपणे मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी प्रथमच अधिकृत पत्रव्यवहार करत ही मागणी केली आहे. या निवेदनासोबत त्यांनी जुने कागदोपत्री पुरावे, तसेच फजली १३४४ मधील मोजणीची नोंद असलेला महत्त्वाचा दस्तावेज देखील प्रशासनासमोर सादर केला आहे.

विशेष म्हणजे, जागेवर वाद निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन या निवेदनाची प्रत पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांनाही पाठवण्यात आली आहे. प्रशासनाने याबाबत तात्काळ लक्ष देत कार्यवाही करावी, अशी भिगारे यांची मागणी आहे. शासनाच्या रेकॉर्डच्या आधारे योग्य निर्णय घेऊन, त्यांच्या कुटुंबाचा उपजीविकेचा प्रश्न सोडवावा, असेही त्यांनी म्हटले आहे. भविष्यात या मागणीविषयी वेळकाढूपणा झाल्यास आंदोलनात्मक पावले उचलण्याची वेळ येईल, असा सूचक इशारा देखील भिगारे यांनी दिला आहे. याअगोदरही अशा इनाम जमिनी बळकावल्या गेल्याची उदाहरणे त्यांनी देत, आपल्या हक्काची जमीन परत मिळावी हीच नम्र विनंती प्रशासनाकडे केली आहे.