छत्रपती संभाजीनगर : (प्रतिनिधी) पाहाडसिंगपुरा: पाहाडसिंगपुरा परिसरातील गायरान जमिनीवर भूमाफियांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण करत मोठ्या प्रमाणावर डोंगर सपाटीकरण करून जमिनीला लेवल केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. स्थानिक नागरिकांच्या मते, जिल्हा प्रशासन, विभागीय आयुक्त आणि पोलीस प्रशासन यांच्या संगनमतानेच हा प्रकार सुरू आहे.

अनेक वृत्तपत्रांमध्ये या प्रकरणाचे वारंवार वृत्तांकन होऊनही प्रशासनाने ठोस पावले उचललेली नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, चौका चौकात या विषयावर जोरदार चर्चा सुरू आहे. अतिक्रमण व डोंगर सपाटीकरण कशाच्या आधारे?
गायरान जमीन ही सार्वजनिक मालमत्ता असून, तिचा कोणत्याही वैयक्तिक वापरासाठी विनापरवानगी उपयोग करता येत नाही. मात्र, पाहाडसिंगपुरा येथे मोठ्या प्रमाणावर जमीन सपाट करून तिचा व्यवसायिक वापर करण्याचा डाव असल्याची चर्चा आहे. स्थानिक प्रशासनाने हा प्रकार थांबवण्याऐवजी भूमाफियांना मूकसंमती दिली आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह या प्रकरणात महसूल व पोलिस विभागाने तातडीने चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. जर प्रशासनाने तत्काळ कारवाई केली नाही, तर नागरिक आंदोलन करण्यास तयार असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन भूमाफियांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा या भ्रष्टाचाराविरोधात मोठे जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.