वडोदबाजार : ८० फूट खोल खोदूनही धुराळा
वडोदबाजार : पाण्याची पातळी
कमालीची खालवली असून विहिरींना बाराव्या परसातही पाणी लागत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही बिकट झाला आहे.फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार परिसरात गतवर्षी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुमारे ७० विहिरी मंजूर असून बहुतांश विहिरींची कामे सुरु आहे. एका शेतातील विहिरीचे काम सद्या ८० फुटांवर सुरु असूनही पाण्याचा थेंब लागलेला नाही. विहिरींच्या बांधकामासह खोदकामावर प्रचंड पैसा खर्च करूनही हाती भोपळा येत असल्याने बळीराजा वैतागला आहे. गतवर्षी पर्जन्यमान घटल्याने परिसरातील जलाशये कोरडेच राहिले. परिणामी खरीपासह

रबीचे पीक धोक्यात सापडले.
शेतमशागतीसह पेरणी व मळणीवर केलेला खर्चही निघाला नाही. यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण गणित कोलमडले. तालुक्यात सर्वात मोठे गिरीजा नदीचे पात्र असून ठिकठिकाणी कोल्हापूरी बंधारे आहेत. परंतू गेल्या पावसाळ्यात नदीला एकदाही पूर न आल्याने सर्व बंधारे कोरडेच राहिले. परिणामी नदीकाठच्या विहिरींसह गाव परिसरातील बोअरवेलची पाण्याची पातळी अत्यंत खालावलेली आहे. यामुळे अनेक गावांची तहाण टँकरच्या पाण्यावर भागवावी लागत आहे. अशा परिस्थितीत जनावरांना पाणी पाजण्यासाठी शेतकऱ्यांना कमालीची कसरत करावी लागत आहे. पाणी शेंदून जनावरांना पाजावे लागत आहे. मागील पाच वर्षांत यंदा प्रथमच पाणीबाणी निर्माण झाली आहे.वडोदबाजार येथील एका शेतात विहिरीचे खोदकाम सुरू आहे तर इन्सेटमध्ये ८० फुटांपेक्षा अधिक खोल खोदकाम करूनही मुबलक प्रमाणात पाणी लागलेले नाही.
सात परसावर कसे पाणी लागेल ?
दरम्यान, रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना विहिर बांधकामासाठी शासनाकडून चार लाखांचे अनुदान दिले जाते. पुर्वी हे अनुदान केवळ तीन लाख रुपये होते. गतवर्षीपासून अनुदानात एक लाखांची वाढ झाली आहे. सात परसापर्यंत विहिरीचे खोदकाम करून बांधकाम केल्यावरच संपूर्ण अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना मिळते. मात्र वडोदबाजार परिसरातील काळी जमीन असलेल्या भागात ०८ परसापर्यंत माती लागत असल्याने बांधकामावरच मोठा पैसा खर्च होत आहे. त्यामुळे शासकीय अनुदानात वाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.