छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) ; रेल्वे स्टेशन रोड येथील जागीरदार कॉलनीतील ओपन स्पेस आता पाणी टँकरच्या माफियांचा अड्डा बनला आहे. येथे मोठ्या प्रमाणात पाणी टँकर उभे राहत असून, त्यामुळे नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. रस्त्याच्या मार्गावर टँकर उभे करून जाणाऱ्या लोकांना अडवले जात आहे. विशेष म्हणजे, लहान मुलांच्या खेळण्यासाठी असलेल्या जागेवर सर्रास टँकर पार्किंग केले जात आहे. स्थानिक रहिवाशांनी याबाबत आक्षेप घेतला असता, टँकरचालकांनी शिवीगाळ आणि धमक्या देण्यास सुरुवात केली.

लहान मुलांना दमदाटी करून त्यांच्यात दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. येथील नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या, तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे टँकर माफियांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत आहे. रहिवाशांनी प्रशासनाला आवाहन केले आहे की, तातडीने कारवाई करून या टँकर पार्किंगवर बंदी घालावी आणि रहिवाशांना दिलासा द्यावा.