छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : औरंगाबाद (पहाडसिंगपूर) – गट/सर्वे नं. ४०, ४०/२ मधील सरकारी गायरान/महार हाडोळा जमिनी काही प्रभावशाली व्यक्तींनी तहसील कार्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीने बेकायदेशीररित्या हडप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लॉकडाऊनच्या काळात संगनमत करून या जमिनींवर कब्जा करण्यात आला आणि खोट्या बक्षीसपत्रे, किरायानामे, तसेच बनावट दत्तकपत्रांच्या आधारे जमिनी स्वतःच्या नावावर करून घेण्यात आल्या. विशेष म्हणजे, या प्रकरणात खोटे रक्तसंबंध (Blood Relation) दाखवून लाखो-कोटींच्या सरकारी जमिनी हडप करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असून, गट/सर्वे नं. ४०/२ मधील बौद्ध लेणीच्या पायथ्याशी हे घोटाळे उघडकीस आले आहेत.

वास्तविक पाहता, या जमिनी खरंच भूमिहीनांना द्यायला हव्या, मात्र महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने त्या सत्ताधारी आणि प्रभावशाली लोकांकडे गेल्या आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भूमाफियांचा सुळसुळाटया प्रकरणावर जिल्हा प्रशासन आणि महसूल विभागाने तात्काळ लक्ष घालून सखोल चौकशी करणे अत्यावश्यक आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी जमिनी हडप करून फसवणूक करणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी आणि संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जावी, अशी मागणी होत आहे.

सरकारने त्वरित दखल घेऊन दोषींवर भारतीय दंड संहितेच्या ४२० कलमान्वये गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर खटले चालवावेत. तसेच, ज्या व्यक्तींनी या जमिनी बेकायदेशीरपणे आपल्या नावावर करून घेतल्या आहेत, त्यांच्याकडून तात्काळ जमीन परत घेऊन खऱ्या भूमिहीनांना वाटप करावी, अन्यथा मोठ्या जनआंदोलनाचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.