छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधि): संभाजीनगर, पहाडसिंगपूरा येथील महार हडूळ इनामी जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात काही व्यक्तींनी खोटी कागदपत्रे तयार करून मोजे गट क्र. ३८, ३९, ४०, ४०/१, ४०/२, ४०/३ या जमिनीवर बेकायदेशीर नोंदी करून घेतल्या आहेत. या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी संतोष भिंगारे यांनी केली आहे. सदर जमीन ऐतिहासिक दस्तऐवजांनुसार बाळाजी महार यांच्या नावावर असून, निजामकालीन कागदपत्रे आणि फाजल १३४४ मध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र, काही व्यक्तींनी संगनमताने खोटी कागदपत्रे तयार करून जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकाराची तातडीने चौकशी करून सत्यता पडताळावी, खोट्या नोंदी रद्द करून मूळ हक्कदारांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सचिवालय, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले असून, पुराव्यांसह संपूर्ण प्रकरणाची माहिती प्रशासनास सादर करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत जमिनीवरील कोणत्याही प्रकारचे फेरफार, विक्री किंवा व्यवहार थांबवण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. या गैरव्यवहारातील दोषींवर कठोर कारवाई करावी आणि अन्यायग्रस्त कुटुंबाला त्वरित न्याय द्यावा, अशी संतोष भिंगारे यांनी प्रशासनाकडे ठाम मागणी केली आहे.
