छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : पहाडसिंगपूरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून डोंगर फोडून मोठ्या प्रमाणावर मुरूम चोरण्याचं गंभीर प्रकरण समोर आलं आहे. रात्रभर पोकलँड व जेसीबीच्या साहाय्याने डोंगर फोडण्यात येत असून, खाम नदी पात्रात बेकायदेशीर पातळीकरण (लेव्हलिंग) केलं जात आहे. या प्रकारामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होतो आहे, मात्र तहसील प्रशासन आणि स्थानिक पोलीस यांचं याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष दिसून येत आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. परवानगीशिवाय सुरू असलेली डोंगर फोडणी या संपूर्ण कामासाठी कोणतीही शासकीय परवानगी घेण्यात आलेली नाही. ना महसूल विभागाची ना वन विभागाची परवानगी असूनही, रात्रीच्या अंधारात भू-माफियांचा डोंगरफोडीचा उद्योग बिनधास्त सुरू आहे. या माफियांकडून स्थानिक पर्यावरणाची होणारी हानी, जलस्रोतांवर होणारा परिणाम आणि परिसरातील जैवविविधतेचा ऱ्हास हे अत्यंत चिंताजनक आहे.

खाम नदीचे रूपांतर खासगी मालमत्तेत ? खाम नदीच्या पात्राला कृत्रिमरित्या सपाट केलं जात असून, त्यावर अतिक्रमण केलं जात आहे. त्यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण होऊन भविष्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भू-माफियांकडून या भूमीवर नंतरच्या टप्प्यात प्लॉटिंग करून विक्रीचा डाव असल्याचं बोललं जातं. प्रशासन आणि पोलिसांकडून मौन? या अवैध कामगिरीबद्दल तहसील प्रशासन आणि स्थानिक पोलिसांना वारंवार तक्रारी देऊनही कोणतीही कारवाई होत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. उलट संबंधित यंत्रणांच्या आशीर्वादानेच हा उद्योग सुरू असल्याचा संशय नागरिकांमध्ये व्यक्त होतो आहे. स्थानीकांचा संताप या प्रकारावर त्वरित कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.