छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : देशमुखनगर येथील श्री १००८ मल्लीनाथ दिगंबर जैन मंदिरात प. पू. उपाध्याय १०८ विरंजनसागरजी महाराज यांच्या सानिध्यात दहा दिवसांचे पर्युषण महापर्व सुरू होत आहे. जबलपूरहून आलेल्या मुनिसंघाच्या उपस्थितीत हा चातुर्मास सुरू असून, दैनंदिन धार्मिक कार्यक्रमांना जैन समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. २८ ऑगस्टपासून प्रारंभ होणाऱ्या पर्युषण महापर्वासाठी शोभायात्रा, घटयात्रा, प्रवचन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. भक्ती, साधना आणि प्रवचनांनी सजलेल्या या पर्वात सकाळी ध्यानशिबिर, पंचामृत अभिषेक, सामूहिक पूजन व तत्वार्थ सूत्र मंडळ विधानासारखे अनोखे उपक्रम पार पडणार आहेत. संध्याकाळी प्रतिक्रमण, भक्ती संध्या, आरती व पंडित मुकेश भैया यांचे प्रवचन या पर्वाला अध्यात्मिक उंचीवर नेतील. विशेषतः उपाध्याय विरंजनसागरजी महाराज यांच्या प्रवचनांत दशलक्षण धर्मांचे सखोल मार्गदर्शन होणार असून, श्रद्धाळूसाठी हे पर्व आत्मशुद्धीचा एक महान अनुभव ठरणार आहे. महाराजांनी प्रवचनात विरंजनसागरजी महाराज एवं ससं कर्ता श्री. १००८ भगवान महिना सांगितले की, पर्युषण हे आत्मशुद्धीचे सर्वोच्च पर्व असून क्षमा, संयम, सत्य, त्याग आणि ब्रह्मचर्य या दशलक्षण धर्मांच्या आचरणातून जीवनात शांती आणि सौहार्द निर्माण होते. या भव्य आयोजनाचा लाभ घेण्यासाठी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हजारांहून अधिक श्रद्धाळूसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, सर्व कार्यक्रम भगवान मल्लीनाथ देशना मंडळ, देशमुखनगर, शिवाजीनगर येथे पार पडणार आहेत.
