छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : दि. 26 जुलै शहरातील मिलकार्नर भागात असलेल्या लकी स्टार हॉटेलसमोर वृत्तांकन करत असलेल्या पत्रकारावर पाच जणांच्या टोळक्याने हल्ला केला. पत्रकाराचा मोबाईल हिसकावून घेत त्यामधील व्हिडीओ व फोटो डिलिट करत पुरावे नष्ट करण्यात आले. यानंतर धमकी, मारहाण आणि अपमानास्पद वर्तन करत गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडला आहे. क्रांती चौक पोलीस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, मच्छिंद्र आनंदराव नागरे (वय 47) हे छायाचित्रकार व पत्रकार म्हणून दैनिक भास्करमध्ये कार्यरत आहेत. 25 जुलै रोजी संध्याकाळी सुमारे 7 ते 7.30 च्या दरम्यान शहरातील मिलकार्नर भागात लकी स्टार हॉटेल येथे सिटी चौक पोलिसांनी टाकलेल्या जुगार अड्ड्यावरील छाप्याचे वृत्तांकन करताना त्यांच्यावर हल्ला झाला. नागरे यांनी हॉटेल समोर उभे राहून मोबाइलमध्ये फोटो व व्हिडीओ घेत असताना हॉटेल मालक अफसर खान याने त्याला थांबविण्याचे आदेश दिले.

त्यानंतर अफसर खान याचा मुलगा आणि त्याच्या चार साथीदारांनी बेकायदेशीर जमाव जमवून नागरे यांच्यावर हल्ला चढवला. मोबाईल हिसकावून घेत त्यातील सर्व व्हिडीओ आणि फोटो डिलिट करून पुरावे नष्ट केले. त्यानंतर मोबाईल परत करताना, “तू आम्हाला ओळखत नाहीस का? तुला गायब करून टाकू, हातपाय तोडू” अशा शब्दांत धमकी देण्यात आली. त्यांच्यावर मारहाण, शिवीगाळ आणि विनयभंगासारखे कृत्यही करण्यात आले. या घटनेनंतर नागरे यांनी क्रांती चौक पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी बीएनएस कलम 189(2), 191(2), 115(2), 352, 351(2) तसेच महाराष्ट्र पत्रकार सुरक्षा कायदा २०१७ चे कलम 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरातील पत्रकार वर्तुळात संतापाचे वातावरण असून, पत्रकार सुरक्षा कायदा राबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.