छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी): घरगुती कारणावरून आपसात वाद होऊन पत्नी व मुलाने एका ६२ वर्षीय इसमाच्या डोक्यात लाकडी पाट व दगडी वरवंटा मारून गंभीर जखमी करून त्यास ठार मारल्याची घटना गुरुवारी (दि.९) रात्री वाळूज महानगरातील जोगेश्वरी येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभाकर पुंजाजी त्रिभुवन (६२ रा. जो गेश्वरी ता. गंगापूर) हे पत्नी अनिता व मुलगा दिलीप यांच्यासोबत जोगेश्वरी येथे राहत होते. प्रभाकर यांना दारूचे व्यसन असल्याने ते घरात नेहमी वाद घालत असत. गुरुवारी रात्री घरगुती कारणावरून
प्रभाकर त्रिभुवन पत्नी अनिता त्रिभुवन व मुलगा दिलीप त्रिभुवन यांच्यात वाद होऊन ते जोरजोरात भांडण करू लागले. दरम्यान त्यांचा वाद विकोपाला गेल्याने पत्नी व मुलाने प्रभाकर यांना मारहाण सुरु केली. यावेळी अनिता त्रिभुवन यांनी पती प्रभाकर त्रिभुवन यांच्या डोक्यात लाकडी पाट व दगडी वरवंटा मारून त्यांना गंभीर जखमी केले. यावेळी दिलीप याने देखील वडील प्रभाकर यांच्या डोक्यात लाकडी पाटाने मारहाण केल्याने या घटनेत प्रभाकर हे घटनास्थळी बेशुद्ध पडले. प्रभाकर हे जमिनीवर बेशुद्ध पडल्याचे पाहून त्यांच्या शेजारी राहणारा पुतण्या बबन त्रिभुवन, सोमनाथ त्रिभुवन हे प्रभाकर यांना दवाखान्यात घेऊन चला असे म्हणत असतांना अनिता व दिलीप यांनी त्यांना विरोध करून ते मेले तरी चालतील आम्ही त्यांना दवाखान्यात नेऊ देणार नाही

. तुम्ही आमच्या भांडणात पडू नका असे सांगितले. दुसऱ्या दिवशी बबन त्रिभुवन याने बाबासाहेब मगरे यास फोन करून प्रभाकर यांना बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी घाटी दवाखान्यात दाखल केले. याठिकाणी उपचार सुरु असतांना रविवारी (दि.१२) रोजी सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास प्रभाकर त्रिभुवन यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयत प्रभाकर यांचा पुतण्या बबन त्रिभुवन यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अनिता त्रिभुवन, दिलीप त्रिभुवन यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी अनिता त्रिभुवन, दिलीप त्रिभुवन यांना ताब्यात घेतले आहे.