गंगापूर (प्रतिनिधी) : गंगापूर तालुक्यातील नेवरगाव सर्कल अंतर्गत नरहरी राजनगाव ग्रुप ग्रामपंचायत पिंपरी येथे १५ वा वित्त आयोगातून मंजूर झालेल्या विकास कामांमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. ग्रामपंचायत सदस्य सुनील मस्के यांच्या तक्रारीनंतर ६ मार्च २०२४ रोजी चौकशी लावण्यात आली. चौकशीदरम्यान तत्कालीन ग्रामसेवक शिवाजी पवार, ग्रामसेवक आर. के. वाघ, तसेच सरपंच आणि उपसरपंच यांनी शासनाच्या निधीचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले. विकास कामांच्या नावाखाली खोट्या नोंदी करून ग्रामपंचायतीची फसवणूक करण्यात आली. २१ फेब्रुवारी २०२४ रोजी नरहरी राजनगाव ग्रामपंचायतीत कागदोपत्री पडताळणी केली असता, अनेक अनियमितता आढळून आल्या. चौकशी अहवाल पंचायत समिती, गंगापूर यांच्या कडे सादर करण्यात आला आहे. परंतु, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या तत्कालीन ग्रामसेवक शिवाजी पवार आणि इतर दोषींवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. उलट, गटविकास अधिकारी सुहास वाघचौरे यांनी हा अहवाल दडपून ठेवल्याचा आरोप होत आहे

. सदर प्रकरणात दलित वस्ती सुधार योजनेतील निधीचाही अपहार झाला असून, डीएससी ऑपरेटरकडून बनावट बिले तयार करून शासनाची फसवणूक करण्यात आली. चौकशी अहवालात स्पष्ट उल्लेख आहे की, तत्कालीन ग्रामसेवक एस. आर. पवार, ग्रामसेवक वाघ आणि सरपंच हे आर्थिक गैरव्यवहारासाठी जबाबदार हेत. आजवर कारवाई न झाल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. दोषींवर कठोर प्रशासनिक कारवाई व्हावी आणि हा घोटाळा करणाऱ्यांना तातडीने शिक्षा मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.