मुंबई ; राज्यातील विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. त्यामुळे, भाजप महायुतीने तब्बल २३६ जागांसह स्पष्ट बहुमताचा जादुई आकडा गाठला आहे. तर, काँग्रेस महाविकास आघाडीला केवळ ४९ जागांवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे, निवडणुकीत लाडक्या बहिणीने महायुतीच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरल्याचं म्हटलं. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आता, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचे आभार मानले आहेत. एकनाथ शिंदेंनी वर्षा निवासस्थानी लाडक्या बहिणींचं स्वागत करत शुभेच्छा दिल्या, तसेच लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणादेखील केली. शिवसेना महायुतीच्या जाहीरनाम्यातील वचनाप्रमाणे राज्यातील लाडक्या बहिणींना लवकरच १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देण्यात येतील,

असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. लाडक्या बहिणींनी राज्यात इतिहास घडवला आहे. राज्यात लाडकी बहिण योजना सुपरहीट झाली. माझी बहिण लाडकी, विरोधकांच्या मनात भरली धडकी, तर काही लोकं फिट येऊन चक्कर येऊन पडल्याचे सांगत विरोधकांवर टीका केली. एक दैदिप्यमान विजय आपल्याला मिळाला आहे. विरोधकांना विरोधी नेता बनवायला संख्या नाही, तुम्ही साफ धूऊन टाकलंय अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदेंनी लाडक्या बहिणींवर कौतुकाचा वर्षाव केला. राज्यात यंदा लाडक्या बहिणींची लाट होती आणि त्यात विरोधक वाहून गेले, हा चमत्कार लाडक्या बहिणींनी केला.