पैठण, (प्रतिनिधी): शरीरावर घातक परिणाम करणाऱ्या कॅल्शियम कार्बाइड पावडरने पिकवलेले आंबे पैठण तालुक्यात सर्रासपणे विक्री केले जात आहे. याकडे अन्न व भेसळ विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होताना दिसत आहे.तालुक्यात सर्वत्र मोठ्यप्रमाणावर आंब्याची आवक वाढली आहे पिवळे आंबे पाहून साहजिकच तोंडाला पाणी सुटते. त्यामुळे आंबे खरेदीचा मोह सुटतो. हे पिवळे चकमकीत दिसणारे आंबे हे कृत्रिम रित्या पिकवलेले असतात. दिसायला जरी चमकदार असले तरी खायला मात्र त्याची गोडी आंबट असते.

प्रशासनाकडून व्यापक मोहीमेची गरज
पिवळे धमक रसाळ आंबे बाजारपेठेत दिसतात, पण यापैकी कार्बाइडने पिकवलेले आंबे कसे ओळखायचे याबाबत पुरेशी जनजागृती नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्न औषध प्रशासनाने व्यापक मोहीम उघडावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. आंबे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर करू नका, त्याऐवजी इथिलिन गॅसचा वापरा, असे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत. तथापि, कार्बाइडचा वापर आंबे पिकवण्यासाठी केला जातो. कॅल्शियम कार्बाइडमुळे अतिरिक्त उष्णता निर्माण होऊन आंबा लवकर पिकतो. मात्र, अशा पद्धतीने पिकवलेले आंबे खाल्ल्यामुळे तोंडाला फोड येणे, त्वचेवर दाण्यासारखे डाग पडणे आणि पचनसंबंधी विकार असे दुष्परिणाम दिसून येतात. आंबे पिकवण्यासाठी कार्बाइडचा वापर करणे हा गुन्हा आहे.