छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी शेख मोसिन ) ; प्रतिनिधी: शहरात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांसह वाहतूक पोलिसांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दुपारी तापमान उच्चांक गाठत असल्याने ट्रॅफिक सिग्नलवर थांबलेल्या वाहनधारकांना तसेच कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना तब्येतीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेता दुपारी १२ ते सायंकाळी ४ या कालावधीत शहरातील ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवावेत, अशी मागणी एम आय एम पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात एम आय एम युवा जिल्हा कार्याध्यक्ष जावेद खान, शहर महिला कार्याध्यक्ष अंकिता गजहास, युवा नेते प्रांतोष वाघमारे,मा .मध्य विधानसभा अध्यक्ष इम्तियाज खान,खलील खान, अजहर खान यांनी वाहतूक शाखेचे मा. पोलीस उपायुक्त यांना अधिकृत निवेदन सादर केले आहे. या निवेदनात अत्यधिक उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासाचे वर्णन करत, सिग्नलवर उभे राहण्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. “उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नलवर उभे असणारे नागरिक आणि ड्युटीवर असलेले पोलीस दोघांचेही आरोग्य धोक्यात येत आहे.

त्यामुळे उन्हाच्या तीव्र काळात सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घ्यावा,” असे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांच्यासोबत ए आय एम आय एम सिस्टमंडळाने चर्चा केल्यानंतर त्वरितच त्यांनी मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकाऱ्यांना कारवाईस्तव आदेशित केले. त्याबद्दल शिष्टमंडळाने त्यांचे आभार मानले