छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : “दारूबाजांना संरक्षण, शेतकऱ्याला अन्याय!” – असा थेट आरोप करत पैठण तालुक्यातील पैठणखेडा गावातील शेतकरी राजू मारुती भुजंग यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर 13 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले. मात्र प्रशासनाने दखल न घेतल्याने हे आंदोलन आता साखळी उपोषणात रूपांतरित झाले आहे. “गट क्र. 18 मौजे जैतपूर शिवार येथील आमच्या कायदेशीर जमिनीवर पारधी समाजातील महिलेने बेकायदेशीर देशी दारू विक्री सुरू करून गावात दहशत निर्माण केली आहे,” असा आरोप भुजंग यांनी केला. शेतकऱ्याच्या मते, या महिलेने वेळोवेळी गावकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले, त्यांच्या पिकांची हानी केली आणि बाहेरगावचे लोक आणून प्राणघातक हल्ले केले. “हल्ल्यात माझे वडील व भाऊ जखमी झाले, हत्यारे पोलिसांकडे जमा आहेत, पण कारवाई मात्र शून्य! कारण पोलिस तिच्या बाजूने आहेत,”

असा संताप भुजंग यांनी व्यक्त केला.भुजंग यांनी थेट बिडकीन पोलिसांवर गंभीर आरोप करत म्हटले की, “आर्थिक देवाणघेवाण करून पोलीस या महिलेचे संरक्षण करतात. म्हणूनच तिला कायद्याची भीती नाही. आमच्या न्यायासाठी पोलीस ठाण्याच्या पीएसआयवरसुद्धा ठोस कारवाई झाली पाहिजे.” त्यांनी स्पष्ट केले की दारूबाज व गुन्हेगारांना पोलीस संरक्षण मिळाल्यामुळेच संपूर्ण गाव भयभीत झाले आहे. यावेळी भुजंग यांनी प्रशासनाला इशारा दिला की, “जर तातडीने कारवाई झाली नाही तर हे उपोषण तीव्र होईल. ढोलताशा, फटाके व मोर्चासह मोठे जनआंदोलन उभारले जाईल आणि प्रशासन झोपेतून जागे केले जाईल.” शेतकऱ्याचा हा आक्रोश आणि पोलिसांविरोधातील थेट आरोप आता तालुक्यात चर्चेचा विषय ठरत असून, “दारूबाजांच्या पाठिशी बिडकीन पोलिस?” हा सवाल प्रशासनाच्या गळ्याला फास ठरत आहे.