छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर येथील सातोंष साडुंजी भिगांरे यांनी पोलीस आयुक्तांकडे सादर केलेल्या तक्रारीत गंभीर आरोप करत म्हटले आहे की, त्यांच्या पूर्वजांची इनामी जमीन काही व्यक्तींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित जमीन मौजे पहाडसिंगपुरा येथील गट क्रमांक ३९, ४०, ४०/१, ४०/२ व ४०/३ मध्ये असून, मूळ दस्तावेजांनुसार ती जमीन त्यांच्या पूर्वज देवाजी बाळाराम महार, पटेदार यांच्या मालकीची आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, संबंधित व्यक्तींनी बनावट दस्तऐवज तयार करून त्या आधारे जमीन बळकावण्याचा डाव रचला आहे. विशेष म्हणजे, सदर जमिनीवर सध्या बेकायदेशीरपणे सपाटीकरण आणि डोंगर फोडण्याचे काम सुरू असून, या कृत्यामुळे पर्यावरणाचा र्हास होण्याची शक्यता आहे. हे संपूर्ण प्रकरण फक्त बेकायदेशीरच नाही तर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा ठरतो

. भिगांरे यांनी आपल्या तक्रारीत पोलिस प्रशासनाला विनंती केली आहे की, तत्काळ मूळ दस्तावेजांची तपासणी करून खोट्या कागदपत्रांच्या आधारे जमीन बळकावणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याचबरोबर सुरू असलेले बेकायदेशीर सपाटीकरण आणि डोंगर फोडण्याचे काम थांबवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत. ही तक्रार केवळ बेगमपुरा पोलिस ठाण्यातच नव्हे, तर थेट पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडेही सादर करण्यात आली असून, दलित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी, अशी भिगांरे यांची मागणी आहे.