छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात दलित कुटुंबाच्या जमिनीचा बेकायदेशीर हस्तांतरणाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. राज्यघटना बचाओ संघर्ष संघ यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, मौजे पहाडसिंहपूरा येथील गट क्रमांक ३९/१, ३९/२, ४०/१, ४०/२, ४०/३ या जमिनीचे मूळ पट्टेदार बाळाराम महार हे दलित होते. मात्र सद्यस्थितीत या जमिनीवर महावु मराठे यांचे नाव ७/१२ उताऱ्यावर आढळून येत आहे. यामागे कोणते दस्तावेज आहेत आणि हा बदल कोणत्या आधारावर करण्यात आला, हे अद्याप स्पष्ट नाही. सदर घटनेमुळे दलित कुटुंबावर अन्याय झाला असून, जातीय अत्याचाराचा संशय उपस्थित होतो, असे संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश महाले यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. याप्रकरणी त्यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे.

विशेषतः वर्ग २ जमिनीचे वर्ग १ मध्ये रूपांतर कशा पद्धतीने आणि कोणत्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने झाले याची चौकशी केली जावी, अशी आग्रही मागणी आहे. संघाने हे प्रकरण केवळ जमीन हक्कापुरते मर्यादित नसून, हे दलितांवर झालेल्या सामाजिक अन्यायाचे प्रतिनिधित्व करणारे प्रकरण असल्याचे अधोरेखित केले आहे. त्यामुळे जर कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर कागदपत्रांचा आधार घेऊन जमीन हस्तांतरण झाले असेल, तर संबंधितांवर SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायदा (Atrocities Act) अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशयाची छाया निर्माण झाली असून, संपूर्ण व्यवहाराची पारदर्शक व निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक आहे. अन्यथा दलित समाजात प्रशासनाविषयी असंतोष वाढू शकतो. ही बाब गंभीर असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या तक्रारीची तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जनतेतून मागणी होत आहे.