छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी): रजिस्ट्री कार्यालय मागील वर्षभरापासून वेगवेगळ्या कारणामुळे नेहमीच चर्चेत राहत आहे. याठिकाणी मागील काही दिवसात दोनदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. तर मागील सहा महिन्यात दोनदा दस्त नोंदणी कार्यालयात ग्राहक पळवण्याच्या कारणावरून फ्री स्टाईल हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे या कार्यालयातील एजंट आणि अधिकाऱ्यांमधील साट्यालोट्याचा व्यवहार समोर आला आहे. याच कार्यालय परिसरातील झालेल्या कारवाई मध्ये पुन्हा एकदा रजिस्ट्री कार्यालयातील अर्थपूर्ण कारभार चव्हाट्यावर आला आहे. रजिस्ट्री कार्यालयामध्ये एजंट मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. कोणतेही काम करायचेअसल्यास एजंटच्या माध्यमातून तेच करावे लागते. एजंट आणि अधिकारी यांच्यामध्ये साटेलोटे असून एजंटचीच कामे अधिकाऱ्याकडून लवकर केली जातात. यासाठी एजंट देखील ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम आकारात असलयाचे पाहायला मिळतआहे. यातील मोठा वाटा हा दस्त नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा असल्याचे देखील ते उघडपणे सांगत आहे. या साखळीला ब्रेक लावण्यात उप निबंधक अयशस्वी झाला आहे.

चौकशी समिती बसवली
एजंटच्या माध्यमातून तुकडा बंदी असताना देखील सर्रास तुकड्याच्या रजिस्ट्री सुरु असून याबाबत जिल्हाधिकारी यांनी देखील चौकशी समिती बसवली आहे. मात्र या समितीला केराची टोपली रजिस्ट्री कार्यालयाकडून दाखवण्यात येत आहे. गुरुवारी झालेल्या कारवाईत खासगी एजंट पकडला गेला मात्र त्यामध्ये सामील असलेले अधिकारी मात्र वाऱ्यावर सोडल्याची चर्चा रजिस्ट्री कार्यालयामध्ये सुरु होती.