छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) ; पहाडसिंगपुरा गट / सर्वे नंबर ४०/व ४०/२ येथे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या पहाडसिंगपुरा बौद्ध लेणीच्या पायथ्याशी असलेल्या गायरान जमिनीवर भूमाफियांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत कब्जा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, महसूल विभाग आणि प्रशासनाने याकडे पूर्णपणे कानाडोळा केल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. गायरान जमीन ही सार्वजनिक मालमत्ता असून, तिचा उपयोग गावकऱ्यांसाठी आणि गोचर भूमीसाठी होतो. मात्र, काही सत्ताधारी आणि भूमाफियांच्या संगनमताने या जमिनीवर बेकायदेशीर लेव्हलिंग सुरू असल्याचे दिसून येत आहे. हे संपूर्ण प्रकरण महसूल विभागाच्या नजरेआड का राहिले? प्रशासन का झोपले आहे?

कुंभकर्णी झोपेतून प्रशासनाला जाग येणार का?
स्थानिकांनी याबाबत वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने भूमाफियांचे मनोधैर्य वाढत आहे. जर वेळीच कठोर पावले उचलली नाहीत, तर या ऐतिहासिक स्थळाच्या परिसरातील गायरान जमिनही खासगी मालमत्तेत रूपांतरित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.आता जिल्हाधिकारी आणि महसूल प्रशासनाला जाग येणार का? की हे प्रकरणही अन्य अनेक प्रकरणांसारखे दडपले जाणार? प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून भूमाफियांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.