छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) यंदाच्या उन्हाळ्यात ज्या ज्या गावाल टैंकरने पाणी पुरवठा करावा लागला त्या प्रत्येक गावात जलसमृद्ध गाव अभियान राबवावे. पाण्याचा थेंब न थेंब अडवावा. गाव खऱ्या अर्थाने जलसमृद्ध करावे. लोकांचा सहभाग घेऊन जलसमृद्ध गाव अभियान हे खऱ्या अर्थाने लोकचळवळ व्हावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहायक या ग्रामस्तरावरील कर्मचाऱ्यांना दिले.जिल्ह्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी राबवावयाच्या प्रभावी उपाययोजनेच भाग म्हणून जलपुनर्भरणाच्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी यंदा ज्या गावांत टँकरने पाणी पुरवठा करावा लागला अशा गावांची प्राधान्याने निवड करण्यात
येत आहे. त्यासाठी गावागावात पर्यावरण दिना (दि.५) पासून जनजागृती व नियोजन बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. नियोजनानुसार दि.६ ते १३ या दरम्यान गावागावांत प्रत्यक्ष करावयाच्या कामाचा, पुनर्भरण करावयाच्या विहीरी, बोअरवेल, पर्जन्यजल साठवण इ. उपायोजना राबवावयाच्या शासकीय, खाजगी इमारती घरे यांची माहिती संकलित केली जाणार आहे

. त्याअनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामस्तरीय कर्मचारी ग्रामसेवक, कृषी सहायक व तलाठी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद
खिरोळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, वरिष्ठ भू वैज्ञानिक जीवन बेडवाल, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड उपस्थित होते तसेच जिल्ह्यातील अन्य उपविभागीय अधिकारी इ. दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी देशमुख यांनी जल पुनर्भरण उपाययोजनांच्या तांत्रिक बाबींची माहिती दिली. अत्यंत कमी खर्चात व कमी संसाधनात हा अत्यंत प्रभावी उपचार असून तो राबविल्याने त्या त्या परिसरातील भूजल पातळीत वाढ हमखास होऊन भविष्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर आपण सहज मात करु शकतो, असे त्यांनी सागितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना म्हणाले की, जलपुनर्भरणाची करावयाची ही अत्यंत साधी सोपी पद्धत आहे. यातील अनेक कामे ही मनरेगा मध्ये सहज घेता येतात. त्याचे नियोजन यंत्रणेने करावे. याअभियानाला वृक्ष रोपणाची जोड द्यावी, लोकांचा सहभाग सर्वात महत्त्वाचा आहे. त्यासाठी गावाल बैठका घेऊन लोकांना या अभियानात सहभागी होण्यासाठी आवाहन करा.