सगळीच कामे अपूर्ण ; पाणीपुरवठ्याची बोंबाबोंब तरीही अधिकांश बिले वाटप
कन्नड ; (प्रतिनीधी शिवाजी नवले )- तालुक्यातील १७६ गावांमध्ये जल जीवन
मिशन योजने अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झालेल्या असून, यापैकी एकाही गावाची योजना १०० टक्के पुर्ण झालेली नसताना, अधिकारी मात्र ठेकेदारांना अधिकांश बिले अदा करून मोकळे झाल्याने, पाण्याच्या नावाने बोंबाबोंब असलेल्या गावातील ही योजना कधी पूर्ण होणार, या बाबत तर्क वितर्क लढविले जात आहेत.
कन्नड तालुक्यात १७६ गावांमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत जल जीवन मिशन योजनेची कामे केवळ कागदोपत्री सुरु आहेत. ही कामे पूर्ण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारच्या नैपकोन या खाजगी कंपनीची असून त्यावर जिल्हा परिषद कार्यालयाचे नियंत्रण आहे. खाजगी कंपनीचे ६ व जिल्हा परिषदेचे ४ असे १० अभियंता या कामांवर लक्ष ठेवून असले तरीही १७६ पैकी एकाही गावातील योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. केंद्र व राज्य सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करूनही गावोगावी पाण्याच्या नावाने बोंबाबोंब आहे. मुंडवाडी, साखरवेल, उंबरखेड तांडा या गावात योजनेचे काम ९० टक्के पूर्ण झाले तरी गावात पाणीटंचाई कायम आहे

. तसेच ५० टक्क्यामध्ये १५ गावाच्या योजनेचे काम झाले असून,
आलापुर, आठेगाव, लामनगाव या गावात योजनेचे काम अद्यापही सुरु झालेले नाही. या योजनेसाठी जिल्हा परिषदेने नेमून दिलेल्या बहुतांश ठेकेदारांनी पहिले, दुसरे आणि तिसरे बिलही काम पूर्ण न करताच उचलले आहे. कामे पूर्ण न करताच ठेकेदारांना सढळ हाताने बिले वाटणारे अधिकारी आता कामे पूर्ण करून घेण्यासाठी ठेकेदारांच्या मागे लागले असल्याचे, उफराटे चित्र येथे दिसत आहे. गावागावांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी केंद्र व राज्य
सरकार पाण्यासारखा पैसा खर्च करत असताना अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमत आणि स्वार्थी हेतूने एकीकडे जनता त्रस्त आहे तर दुसरीकडे या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी सरकारला खचर्चाचा वेगळा भुर्दंड सोसावा लागत आहे. पाणीटंचाईच्या काळात या योजनेचा उपयोग होत नसेल तर अशा योजना नंतर
पूर्ण करून काय फायदा. या ठिकाणी एका गीताच्या काही ओळी आठवतात त्या अशा,
कभी प्यासे को पाणी
पिलाया नही…
बाद अमृत पिलाने से
क्या फायदा……!!