मुंबई: प्रस्तावित विशेष जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांनी एकत्र येत तीव्र लढा उभारण्याचा निर्धार केला आहे. हा कायदा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गंभीर गदा आणणारा असून, पत्रकार आणि प्रसारमाध्यमांना याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे ३ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १ वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या परिसरात मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. “पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंच”च्या नेतृत्वाखाली मुंबईतील दहा प्रमुख पत्रकार संघटनांनी हा लढा उभारला असून, या कायद्याचा निषेध करण्यासाठी पत्रकार मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरणार आहेत. या संदर्भात नुकतीच मुंबई मराठी पत्रकार संघात बैठक झाली, ज्यामध्ये पत्रकार संघटनांनी एकत्र येत “पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंच” स्थापन केला. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या कायद्याविरोधातील पत्रकारांची भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे. तसेच, पत्रकार तुषार खरात आणि इतरांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे रद्द करण्याची मागणी देखील या वेळी केली जाणार आहे. याशिवाय, विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांशी संवाद साधून त्यांनी या कायद्याला विरोध दर्शवावा, यासाठी प्रयत्न केले जातील.

पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा हा प्रयत्न असल्याने राज्यभर पत्रकारांमध्ये असंतोषाची भावना आहे. ३ एप्रिलच्या आंदोलनानंतर ही लढाई संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच राज्यव्यापी आंदोलनाची तारीखही जाहीर केली जाईल, असा इशारा पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाचे एस. एम. देशमुख आणि संदीप चव्हाण यांनी दिला आहे.पत्रकारांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनात मुंबई मराठी पत्रकार संघ, मराठी पत्रकार परिषद, मुंबई प्रेस क्लब, मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ, टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन, पुणे श्रमिक पत्रकार संघ, बृहन्मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट, बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघ, मुंबई क्राईम रिपोर्टर असोसिएशन आणि मुंबई हिंदी पत्रकार संघ सहभागी होणार आहेत.