छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : राज्यघटना बचाओ संघर्ष संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश किसनराव महाले यांनी तहसील कार्यालयातील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत संबंधित अधिकाऱ्यांच्या मालमत्ता चौकशीची जोरदार मागणी केली आहे. त्यांनी मा. मुख्यमंत्री सचिवालय, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून, अपर तहसीलदार नितीन गर्जे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. महाले यांच्या म्हणण्यानुसार, नितीन गर्जे यांनी बुद्ध लेणी परिसरात कोणतीही अधिकृत परवानगी न घेता लाखो रुपयांची लाच स्विकारून काही राजकीय व्यक्तींच्या सांगण्यावरून बेकायदेशीर डोंगर सपाटीकरणास परवानगी दिली. या प्रकारामुळे तहसील कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक सामान्य नागरिकांना नियमांच्या नावाखाली त्रास दिला जात असताना भ्रष्ट अधिकारी मात्र जनतेच्या पैशावर ऐश करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे

. संघाने निवेदनाद्वारे खालील मागण्या मांडल्या आहेत – तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची मालमत्ता तपासणी करण्यात यावी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करून संशयास्पद बाबी उघड कराव्यात, दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंग व फौजदारी कारवाई करावी, कार्यालयात पारदर्शकता यावी यासाठी ऑनलाइन सेवा प्रणाली लागू करावी आणि जनतेच्या तक्रारींसाठी स्वतंत्र व्हिजिलन्स सेलची स्थापना करावी.गणेश महाले यांनी नमूद केले की, शासन यंत्रणेत अनेक प्रामाणिक अधिकारी कार्यरत आहेत, मात्र काही भ्रष्ट घटकांमुळे प्रशासनाची विश्वासार्हता धोक्यात येत आहे. त्यामुळे तत्काळ कारवाई करून जनतेचा प्रशासनावरचा विश्वास पुन्हा दृढ करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.