छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) –दि.१७/०६/२०२५ महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पान मसाला व सुगंधीत तंबाखूचा साठा वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनावर स्थानिक गुन्हे शाखा, छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) यांनी मोठी कारवाई करत ७२ लाख ५ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १७ जून २०२५ रोजी रात्री सिल्लोड तालुक्यातील आन्वी फाट्याजवळ करण्यात आली.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, अजिंठा ते सिल्लोड मार्गावरून एक आयशर वाहन शासनाने बंदी घातलेला गुटखा विक्रीसाठी नेत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने तत्काळ मौजे आन्वी फाटा परिसरात सापळा रचून संशयित वाहन (क्र. MH-18-BG-8046) थांबवले.
वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये शासनाने बंदी घातलेला विमल पान मसाला व सुगंधीत तंबाखूचा साठा मिळून आला. एकूण १३९ पोत्यांमध्ये भरलेला हा प्रतिबंधित माल आणि वापरण्यात आलेली आयशर गाडी असा एकूण ७२ लाख ५ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वाहनचालक विकास सुभाष पाटील (वय ३४, रा. नंदाळे, ता. शिंदखेडा, जि. धुळे) याला अटक करण्यात आली आहे. सदर माल हा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तपासण्यात आला.

या प्रकरणी अन्नसुरक्षा व मानदंड कायदा २००६ चे कलम ५९ तसेच भारतीय दंड विधान कलम १८८, २७२, २७३, २७४, ३२८ अन्वये सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक डॉ. विनायकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अपर्णा सिंह यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिष वाघ, सहायक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, पोलीस कर्मचारी संतोष पाटोळे, वाल्मिक निकम, विशाल डोके, गोपाल पाटील, कैलास राठोड, दीपक सुरोशे, निलेश कुडे, संजय तांदळे व अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी मोहम्मद फरीद सिद्दिकी यांच्या पथकाने केली.