छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) : दुचाकी चोरी करीत त्यावर नशेच्या गोळ्या (बटन) आणि कफ सिरपची विक्री करणाऱ्या दोघांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या. मंगळवारी (दि.९) सायंकाळी सातारा परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून चोरीच्या दुचाकीसह ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शेख वसीम शेख सलीम (वय ३२, रा. नारेगाव) आणि जावेदखान हमीदखान (वय ४९, रा. अल्तमश कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत

.सातारा भागातील रामदेव बाबा मंदिराच्या पाठीमागे दोन जण नशेच्या गोळ्या विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. यावरून अमली पदार्थ विक्रीविरोधी पथकाने सापळा रचला. यावेळी दुचाकीवरून आलेले दोन संशयित आरोपी शेख वसीम शेख सलीम आणि जावेदखान हमीदखान यांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, नायट्रोसन १० नावाच्या गोळ्यांच्या १२ स्ट्रिप (१२० गोळ्या) व कोनेक्स कफ सिरपच्या ३० बाटल्या आढळून आल्या.