चुकीच्या सोनोग्राफी रिपोर्टमुळे नवजात मुलीचा मृत्यू ;

चुकीच्या सोनोग्राफी रिपोर्टमुळे नवजात मुलीचा मृत्यू ;

वडिलांची संबंधित केंद्राविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी !

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : तालुका सिल्लोड येथील चिचवन गावचे रहिवासी जुबेर अय्युब शहा यांनी आपल्या नवजात मुलीच्या मृत्यूला सोनोग्राफी सेंटरच्या हलगर्जीपणाला जबाबदार धरत, संबंधित केंद्राविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे लेखी अर्जाद्वारे केली आहे. त्यांच्या पत्नीची गर्भावस्थेतील तपासणी चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे एकाच भ्रूणाचा उल्लेख रिपोर्टमध्ये करण्यात आला आणि त्यामुळे योग्य वैद्यकीय उपचार वेळेत मिळाले नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे. जुबेर शहा यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की,२० फेब्रुवारी २०२५ रोजी पत्नी सायमा शहा यांची सिल्लोड येथील सोनोग्राफी सेंटरमध्ये तपासणी झाली होती, त्यात फक्त एकच भ्रूण असल्याचे सांगण्यात आले.

त्यानंतर १७ मे रोजी पिशोर येथील साई समर्थ सोनोग्राफी सेंटरमध्ये केलेल्या दुसऱ्या तपासणीमध्येही तोच निष्कर्ष देण्यात आला. या दोन्ही ठिकाणी चुकीची माहिती देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, २५ मे रोजी छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात सायमा शहा यांची डिलिव्हरी झाली असता दोन मुली जन्माला आल्या. यामध्ये, दुसऱ्या मुलीचे पोटात अस्तित्व ओळखले गेले नसल्याने तिला तत्काळ वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला. ही बाब गंभीर वैद्यकीय दुर्लक्षाची असून, संबंधित केंद्रांची जबाबदारी निश्चितच ठरते, असे शहा यांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे दु:खी झालेल्या वडिलांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०१ नुसार संबंधित सोनोग्राफी सेंटरविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांनी ही तक्रार मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि घाटी रुग्णालयाच्या अधीक्षक यांच्याकडेही प्रतिलिपी पाठवून केली आहे. सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *