छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी): मराठवाड्यात तीव्र दुष्काळ असून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा हे विषय प्राधान्याने घ्यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंत्रणेला दिले. पाणीटंचाईच्या पार्श्वभुमिवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (दि.२३) आढावा घेतला. विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीला मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. हरिभाऊ बागडे, आ. रमेश बोरनारे, आ. संजय शिरसाट, मुख्यसचिव डॉ. नितीन करीर, विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, तसेच जालना,:२३.०५.रक्त कार्यालय हिंगोली, बीड, लातूर, धाराशीव, नांदेड, परभणी या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी दुरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. तसेच बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, तसेच अन्य जिल्ह्यातील मुख्य कार्यकारीअधिकारी, जलसंधारण अधिकारी उपस्थित होते

. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील मागणी केलेल्या गावांना पुरेसे टँकर तात्काळ द्यावेत. प्रस्ताव आल्यास तीन दिवसांत टँकर सुरु करावा. पाण्याचा दर्जा, गुणवत्ता तपासण्यात यावा. गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजनांचे थकीत बिल वसूली तूर्त बाजूला ठेवून नवीन कनेक्शन द्या, मात्र कुठल्याही परिस्थितीत पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा बंद करु नये. गावांमधील ग्रामसेवक, तलाठीबैठका घेवून गावनिहाय मागणी जाणून घ्या. चारा उगवणीसाठी दिलेल्या अनुदानातून चारा उत्पादन झाले आहे. हा चारा पशुपालकांसाठी उपलब्ध आहे. त्याची माहिती पशुपालकांपर्यंत पोहोचवा. भूजल पातळीत झालेली घट लक्षात घेता जलसंधारण उपाययोजना राबवाव्या. टैंकरग्रस्त गावांमध्ये विहीरी, बोअरवेल पुनर्भरण तसेच जलसंधारण उपाययोजना राबवाव्या, जेणेकरुन भविष्यात त्या गावात टँकरने पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता भासू नये, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.