छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी – चैतन्य महाले):
महानगरपालिकेने रस्तारुंदीकरणाच्या नावाखाली हजारो घरे जमीनदोस्त करून शेकडो कुटुंबांना बेघर केले आहे. या बेघर नागरिकांना तात्काळ घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी आज आंदोलनातून केली. महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्या निवासस्थानासमोर हे आंदोलन करण्यात आले. पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली. आंदोलकांनी घोषणाबाजी करत, “मनपाने घर पाडले तर घर देणे ही जबाबदारी आहे, अन्यथा अन्याय सहन केला जाणार नाही” असा इशारा दिला.

विनोद पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, “रस्तारुंदीकरणाच्या नावाखाली सामान्य कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. शासकीय योजनांतून किंवा मनपाच्या माध्यमातून त्वरित पुनर्वसनाची व्यवस्था केली नाही तर ही लढाई आणखी तीव्र केली जाईल.” या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला असून, नागरिकांच्या हक्कासाठी विनोद पाटील आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
