गंगापूर (प्रतिनिधी) : नरहरी, राजनगाव पिपरी: गरीब बळीराजा, कामगार आणि मजूर वर्गाला स्वप्नातील घर देण्याचे आमिष दाखवून ग्रामसेवक शिवाजी पवार यांनी मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. “मी तुमचे घरकुल पूर्ण करून देतो, त्यासाठी घरकुलाची संपूर्ण रक्कम मला द्या, तसेच घरातून ५०,००० रुपये द्या,” असे सांगून त्यांनी अनेक लाभार्थ्यांकडून पैसे उकळले. मात्र, प्रत्यक्षात काही ठिकाणी केवळ विटा, रेती किंवा खडी टाकून काम थांबवण्यात आले, तर अनेकांना अजूनही घरकुलाचा पूर्ण लाभ मिळालेला नाही. लाभार्थ्यांपैकी ताराचंद विठ्ठल मस्के यांनी ₹64,000 दिले, पण दोन वर्षांपासून त्यांचे घर अपूर्ण आहे. एकनाथ जगन्नाथ भागवत यांनी ₹1,10,000 दिले, तरीही घराला दरवाजेही बसवले नाहीत. तर शांताराम पंढरीनाथ मस्के यांचे घर पूर्ण झाले असले, तरी ग्रामसेवकाने शेवटच्या हफ्त्यातून पैसे कपात केल्याने नुकसान झाले

. गरीब मजूर आणि शेतकरी वर्गाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा म्हणून मंजूर करण्यात आलेली घरे ग्रामसेवकाच्या भ्रष्टाचारामुळे अपूर्ण राहिली असून, अनेक पीडित लाभार्थी अजूनही घरकुलाच्या आशेवर वंचित आहेत. याप्रकरणी ग्रामसेवक शिवाजी पवार यांच्यावर कठोर कारवाई करावी, त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून अपहार झालेल्या रकमेची त्वरित परतफेड करावी, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. तसेच, त्यांना कोणतीही पेन्शन देऊ नये आणि भविष्यात अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.