छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाकडून माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत नागरिकांना वेळेत आणि स्पष्ट माहिती न देण्याची भूमिका उघड झाली आहे. संतोष सांडूजी भिंगारे यांनी गट क्रमांक ४२, मौजे पहाडसिंगपुरा येथील गृहनिर्माण संस्थेची माहिती मागितली असता, पालिकेकडून अपुऱ्या कारणांचा आधार घेत माहिती नाकारली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. भिंगारे यांनी २० ऑक्टोबर २०२२ रोजी माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज सादर केला होता. परंतु, महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाने दिनांक १ नोव्हेंबर २०२२ रोजी दिलेल्या उत्तरात अर्जात मागितलेली माहिती स्पष्ट नाही, असा दावा करत अर्जदाराला अधिक तपशील देण्याची मागणी केली आहे. महानगरपालिकेकडे संबंधित गट क्रमांकाचे अभिलेख असूनही अर्जदाराला आवश्यक असलेल्या माहितीचा शोध घेण्यात टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे नागरी सुविधांसाठी माहिती मिळवण्याचा नागरिकांचा हक्क पायदळी तुडवल्याची भावना व्यक्त होत आहे.

अर्जदाराने दिलेल्या माहितीत गट क्रमांक ४२ व मौजे पहाडसिंगपुरा या परिसरातील गृहनिर्माण संस्थेबाबत स्पष्ट मागणी असूनही, पालिका प्रशासनाने अर्जदाराकडून मिळकतधारकाचे नाव, रेखांकन संचिका क्रमांक, रेखांकन आदेश क्रमांक आणि दिनांक यांसारखे अतिरिक्त तपशील मागितले आहेत. यावर स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून, माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन होत असल्याची टीका करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या अपारदर्शक कार्यपद्धतीमुळे नागरी प्रशासनावर विश्वास दाखवणाऱ्या नागरिकांची निराशा झाली असून, आता प्रशासनावर दबाव वाढताना दिसत आहे. व अद्याप कुठलीही माहिती दिली नसून मनपाकडून टाळाटाळ होत आहे.