गंगापूर (प्रतिनिधि ) गंगापूर पोलिस स्टेशन, जे कधीकाळी आदर्श पोलिस ठाणे म्हणून ओळखले जात होते, आज भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या आरोपांमुळे चर्चेत आले आहे. गटविकास अधिकारी सुहास वाघचौरे यांच्या महाघोटाळ्याचा पर्दाफाश सामाजिक कार्यकर्ते भगवान बनकर यांनी दैनिक पब्लिकराज च्या माध्यमातून केला. मात्र, या खुलास्यानंतर त्यांच्यावरच दबाव टाकण्याचा आणि त्यांना धमकावण्याचा प्रयत्न सुरू झाला. भगवान बनकर आणि निर्मला भालेराव यांनी दलित वसाहतीतील शासकीय योजनेतील घोटाळ्यांविरोधात आवाज उठवला. जिल्हा परिषदेसमोर उपोषण करत त्यांनी भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. मात्र, ग्रामविकास अधिकारी धनवयी यांनी त्यांच्यावर चौकशी न करता प्रकरण गप्प बसवण्याचा प्रयत्न केला आणि पैशांची ऑफर दिली. भगवान बनकर यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात निवेदन दिले असतानाही पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही.

उलट, आरोपी अधिकाऱ्यांच्या संगनमताने बनकर यांच्यावरच प्राणघातक हल्ला घडवून आणण्याचा कट रचला गेला. यामुळे पोलिस ठाण्याच्या निष्क्रियतेवर आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमतावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शेतकऱ्यांसाठी मंजूर असलेल्या शेततळे, गाय-गोठा, सिंचन विहीर, घरकुल या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. लाभार्थ्यांना त्यांचे पैसे वेळेत मिळत नाहीत, तर लाचखोरीसाठी पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी हातमिळवणी करत असल्याचा आरोप होत आहे. गंगापूर पोलिस ठाणे लाचखोरीच्या विळख्यात अडकले असताना, सर्वसामान्य नागरिकांनी न्याय मागायचा कुठे? भ्रष्टाचारविरोधी लढा देणाऱ्यांवरच हल्ले होत असतील, तर न्यायव्यवस्था आणि प्रशासनाचा उपयोग कोणासाठी? आता हे प्रकरण उच्चस्तरीय चौकशीसाठी कोणत्या स्तरावर जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.