खुलताबाद : भद्रा मारुती मंदिराच्या परिसरात एका स्त्री जातीच्या नवजात अर्भकाचा (शिशु) त्याग करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी, दि. २० मार्च २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ८ वाजता, मंदिराच्या पश्चिम बाजूच्या गेटजवळ मोकळ्या जागेत अंदाजे २ ते ४ दिवसांचे जिवंत अर्भक आढळून आले. अज्ञात मातेने नवजात अर्भक धोकादायक परिस्थितीत सोडून दिल्याने त्याचा जीव धोक्यात येऊ शकतो, याची पूर्ण कल्पना असूनही तिने जाणून-बुजून त्याग केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सदर अर्भकाची तातडीने वैद्यकीय तपासणी करून त्यास नवजात शिशु सुधारगृह, छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी अज्ञात मातेविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ९३ नुसार कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
