छत्रपती संभाजीनगर – ऐतिहासिक व पर्यावरणीय दृष्ट्या महत्वाच्या बुद्ध लेणी परिसरातील खाम नदीचा प्रवाह भू माफियांनी गिळंकृत केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धबधब्याचे निर्मळ पाणी नदीत मिळत असताना, अवैध उत्खनन करून तब्बल १०० मीटर नदीचा प्रवाह ‘विझवण्यात’ आला आहे. गट क्र. ३९, ४०, ४०/१ व ४०/२ मधील ५०० मीटरपेक्षा अधिक नदी व नाले पात्रांवर डोंगर फोडून कब्जा करण्यात आला असून त्यामुळे स्थानिक शेती, पाण्याचे स्रोत व पर्यावरणीय समतोल धोक्यात आला आहे. स्थानिक नागरिक व पर्यावरण कार्यकर्त्यांनी वारंवार तहसील प्रशासनाकडे तक्रारी केल्या, परंतु प्रशासन बधिर असल्याचा आरोप होत आहे. या निष्क्रियतेमागे प्रबळ राजकीय दबाव आणि भू माफियांना मिळालेले स्थानिक नेत्यांचे संरक्षण असल्याची चर्चा रंगली आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत न्यायालयाने स्वतःहून ‘सुओ मोटो’ याचिका दाखल केली असतानाही तहसील विभागाकडून केवळ कागदोपत्री हालचाली सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

दरम्यान, प्रशासनाने ‘नाले-नदी जोड’ योजनेसाठी आणलेले साहित्य प्रत्यक्षात कुठे वापरले गेले याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ४०० ते ६०० मीटर नाल्याचा मागमूसच नाही. तसेच गट क्र. ३९, ४०/१ व ४०/२ मधील जमिनीत बॉलस्टिंग केल्याचा गंभीर आरोप स्थानिक बुद्ध भिक्षू व नागरिकांनी केला असून, राजकीय दबावामुळे कब्जेदारांवर कोणतीही कठोर कारवाई झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे. पर्यावरण तज्ञांचा इशारा आहे – “आज दुर्लक्ष केल्यास पुढच्या पिढीला खाम नदी फक्त कागदावरच पाहायला मिळेल.” जनतेने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करणे, अवैध कब्जा तात्काळ हटवणे आणि दोषींवर कठोर गुन्हे नोंदवण्याची मागणी केली आहे. अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा पर्यावरण कार्यकर्त्यांनी दिला आहे.