छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : शहरातील पहाडसिंगपुरा येथील ऐतिहासिक बौद्ध लेणी व हनुमान टेकडी परिसरात सर्रासपणे मुरूम उत्खनन सुरू असून शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलाला सुरुंग लागतो आहे. विशेष म्हणजे हे सर्व उत्खनन कोणत्याही परवानगीशिवाय होत असून, यामध्ये भूमाफियांचा हात स्पष्टपणे दिसतो आहे. हे सगळं बघूनही स्थानिक प्रशासन मात्र डोळे झाकून बसले आहे. उत्खनन करणारे भूमाफिया अत्यंत बिनधास्तपणे मुरूम काढून त्याची सर्रास विक्री करत आहेत. स्थानिक नागरिकांनी विरोध केला असता, त्यांना “आम्ही कोणालाही घाबरत नाही – कलेक्टर भी हमारे जेब में आहे” अशी धमकी देण्यात आली. ही भाषा केवळ गुन्हेगारी प्रवृत्तीच नव्हे तर प्रशासनातील काहींच्या संगनमताचा संशयही बळावणारी आहे.
या परिसरातील डोंगर सपाट केले जात असून त्यामुळे परिसरातील ऐतिहासिक व धार्मिक वारसा संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे.

बौद्ध लेणी व हनुमान टेकडी या दोन्ही ठिकाणांचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता ही लूट थांबवणे अत्यावश्यक आहे. हे उत्खनन केवळ पर्यावरणीय संकट निर्माण करत नाही, तर भविष्यातील पर्यटन क्षमतेवरही घातक परिणाम करू शकते. प्रशासन, महसूल व पोलिस विभाग यांचे यावर मौन संशयास्पद ठरत असून, यामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा कयास स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. या गुन्हेगारी कृत्यांमुळे लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासन व प्रशासनाने तातडीने लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे.