कन्नड (प्रतिनिधी शिवाजी नवले) : कन्नड तालुक्यात सध्या अवैध जुगार अड्ड्यांना उधान आले असून, धक्कादायक बाब म्हणजे हे अड्डे थेट पोलीस ठाण्यासमोर खुलेआम सुरू आहेत. कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्या नजरेसमोरच सुरू असलेल्या या अड्ड्यामुळे प्रशासनाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. जुगाराचे हे अड्डे दिवसा तसेच रात्री उशिरापर्यंत सुरू असतात, हे विशेष. या अड्ड्यांमुळे तालुक्यातील युवकांचा मोठ्या प्रमाणावर विनाश होत आहे. शिक्षण, रोजगार आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष करत अनेक तरुण जुगाराच्या दलदलीत अडकले आहेत. आर्थिक नुकसान, कर्जबाजारीपणा आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना चालना मिळत आहे. समाजात फूट पाडणारा आणि नवे व्यसन रुजवणारा हा प्रकार तातडीने थांबवण्याची गरज आहे. नागरिकांकडून पोलिसांवर संगनमताचे गंभीर आरोप होत आहेत. कित्येक वेळा तक्रारी करूनही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास उडत चालला आहे

. काही समाजसेवकांनी या बाबतीत जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रारी दिल्या असून, त्वरीत कारवाईची मागणी केली आहे. जर वेळेवर पावले उचलली नाहीत, तर कन्नड तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता आहे. युवकांच्या भविष्यासमोर असलेले हे संकट दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने हालचाली केल्या पाहिजेत. अन्यथा नागरिकांचा उद्रेक होणे आणि कायदा हातात घेण्यास भाग पाडले जाणे अटळ आहे.