कन्नड (प्रतिनिधी शिवाजी नवले) : कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील 29 गुंठे जागेच्या भाडे पट्टा करारावर मोठा वाद निर्माण झाला आहे. या करारासाठी बाजार समितीने व्यापक जनजागृती न करता कमी खपाच्या दैनिकात जाहिरात देऊन काही मोजक्या व्यापाऱ्यांना अप्रत्यक्षपणे मदत केल्याचा आरोप होत आहे
.गोपनीय व्यवहाराची शक्यता?
सदर जागेचे मूल्य रेडी रेकनरनुसार अंदाजे दीड कोटी रुपये आहे, तर बाजार भावानुसार किंमत सुमारे 15 कोटी रुपये असू शकते. मात्र, बाजार समितीने तीच जागा अत्यल्प दरात काही व्यापाऱ्यांना करारावर दिल्याने समितीचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, दि. 13 जानेवारी 2025 रोजीच बाजार समितीच्या 12 संचालकांनी या करारास विरोध दर्शवला होता, तरीही करार कसा झाला? हा मोठा प्रश्न आहे

.शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये रोष
या प्रकारामुळे कन्नड तालुक्यातील शेतकरी, व्यापारी आणि हमालांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण झाल्याची चर्चा असून, संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्याची जोरदार मागणी होत आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा हा व्यवहार पूर्णतः संशयास्पद असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून हा करार फेर तपासणीस घेतला पाहिजे. शेतकऱ्यांच्या मालकीची ही जमीन व्यापाऱ्यांच्या घशात जाऊ नये आणि बाजार समितीचे मोठे नुकसान होऊ नये, यासाठी हा करार तत्काळ स्थगित करावा, तसेच संपूर्ण व्यवहाराची सखोल चौकशी करण्यात यावी.
प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास शेतकरी व व्यापारी मोठ्या प्रमाणावर आंदोलनाच्या पवित्र्यात जाण्याची शक्यता आहे.