छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : शहरातील ऐतिहासिक आणि संवेदनशील बौद्ध लेणी परिसरातील गट /सर्वे नंबर २९, पहाडसिंगपुरा भागातील भूमाफियांकडून अवैधपणे ऐतिहासिक डोंगर आणि पन्नास वर्षे जुनी झाडे कत्तल करून सपाटीकरण केले जात आहे. हा अत्यंत गंभीर मुद्दा असून, स्थानिक प्रशासनाकडून यावर अजूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अप्पर तहसीलदार आणि मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी या प्रकरणाकडे जाणून बुजून डोळेझाक केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

स्थानिक पोलिस प्रशासन देखील या अवैध क्रियांविरोधात अद्याप कोणतीही ठोस कारवाई करत नाही, ज्यामुळे शहरात चर्चा वाढली आहे. नागरिकांच्या वतीने प्रश्न उपस्थित केला जात आहे की, प्रशासनाच्या मौनामुळे भूमाफियांकडून असे कृत्ये घडत असताना, कायद्याचे पालन करणार्या नागरिकांची सुरक्षा किती सुरक्षित आहे? या संदर्भात एकूणच प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरते आहे, आणि यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, हे नागरिकांच्या संतापाचे कारण बनले आहे. याप्रकरणी प्रशासन आणि पोलिस विभागाची भूमिका कोणती? आणि नागरिकांचे हक्क व संरक्षण राखण्यासाठी यावर लवकरात लवकर कारवाई होईल की नाही, हा प्रश्न आज काल नागरिकांत चर्चेला उधाण देत आहे.
