छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी): अंगावर सोने घालून रस्त्याने जाणाऱ्या महिलेस एवढे सोने घालून फिरता का मावशी असे म्हणत गंडविल्याची घटना सिडको एन ५ परिसरात घडली. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंजना वामनराव गाडेकर (वय ५५) रा. सत्यम नगर सिडको एन ५ यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार २५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्या राजगुरु हेअर क्लिक हॉस्पिटल जवळून रस्त्याने पायी जात होत्या. त्यावेळी दोन अनोळखी इसम आले. त्यांनी मावशी एवढे सोने घालून फिरता का, या रस्त्यावर चोऱ्या होत आहेत. अशी भीती दाखवत अंगावरील दागिने हातातील पिशवी ठेवण्यास सांगितले.

फिर्यादीने गळ्यातील ८० हजार रुपयांची सोन्याची चेन, ४० हजार रुपयांची पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी काढून पिशवीत ठेवली. सदर आरोपींनी फिर्यादीच्या पिशवीत हात घालून सोने नीट पिशवीत खोसून ठेवा असे सांगत अलगद दागिने काढून घेतले. सिडको पोलीस पुढील तपास करीत आहेत.