पाचोड ; (ता. पैठण प्रतिनिधी) — उप अधीक्षक कार्यालय भूमि अभिलेख सजा पाचोड येथे सध्या परिस्थिती अतिशय चिंताजनक झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यालयातील महत्त्वाची शासकीय कागदपत्रे एका निमशासकीय व्यक्तीच्या ताब्यात दिली जात असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, हे सर्व प्रकार कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत घडत असून, या व्यक्तीकडे शासकीय दस्तऐवज हाताळण्याचा अधिकार नेमका कोणी दिला आहे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी तहसील कार्यालय, पैठण येथे एका अधिकाऱ्यास लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले होते

. त्यामुळे सजा पाचोडमध्येही अशाच प्रकारांची पुनरावृत्ती होत असल्याची चर्चा गावागावांत सुरू आहे. नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून, सदर प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.उप अधीक्षक भूमि अभिलेख, पैठण आणि अधीक्षक भूमि अभिलेख, छत्रपती संभाजीनगर हे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ कारवाई करतील का, असा सवाल आता स्थानिकांमध्ये जोर धरू लागला आहे. प्रशासनाने यावर तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.