वैजापूर, (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी घोषणा केली. तेव्हापासून देशात सर्वत्र आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. परंतु असे असतानाही केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचा एक मोठा फलक शहरातील येवला रस्त्यावर आज पर्यंत झळकत आहे. या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असून शेतकऱ्यांना दिलेल्या पिक विमा संदर्भात गुण गाण गायले आहे. हा फलक म्हणजे आदर्श आचारसंहितेची अक्षरक्ष पायमल्ली असून या प्रकरणी कुणावर कारवाई होते. असा प्रश्न उपस्थित होतो आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आचार संहिता लागू होते. निवडणुकीचा निकाल लागे पर्यंत ही आचारसंहिता लागू असते. आचाल संहीतेचा भंग झाल्यावर थेट कारवाई करण्यात येते. नोकरशाहीचा निवडणुकीसाठी गैरवापरहोणार नाही. याचीही काळजी घेतली जाते. आचार संहिता लागू होताच सरकारी कर्मचारी हे निवडणूक आयोगाचे कर्मचारी बनतात.

फलक प्रकरणी कुणावर कारवाई ?
वैजापूर तालुक्यात आचार संहिता लागू झाल्यानंतर भरारी पथके नेमण्यात आली आहेत. सर्व संबंधीतांना आचार संहितेचा भंग होईल असे फलक काढण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेला देखील आचार संहिता भंग होईल असे फलक काढण्याचे आदेश आहेत. परंतू असे सर्व असताना शहरात असे फलक झळकत आहेत. मग सरकारी कर्मचारी जाणीवपूर्वक एखाद्या पक्षाचा प्रचार करतात की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. या फलक प्रकरणी कुणावर कारवाई होते. याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.