खुलताबाद { प्रतिनिधी : सविता पोळक }; मी लहान असताना माझी आजी मांडीवर घेऊन सांगत असे की प्रशांत यदाकदाचीत तुझ्याकडे पैसा, संपत्ती आली किंवा तू मोठा माणूस झाला तर तू लोकांसाठी पुण्य कमव, त्यांना देव दर्शन घडवं आणि तुझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला पोटभरून जेवू खाऊ घालून त्यांच्या हातावर पाणी घाल अशी शिकवण त्यांनी आम्हाला दिली. आणि त्याचाच धागा धरत माझ्या मित्रांसमवेत मी बुद्धगया दर्शन यात्रा, अष्टविनायक यात्रा, पोहरादेवी यात्रा, अजमेर शरीफ यात्रा सुरू केल्या असून या माध्यमातून मतदार संघातील १५ हजारच्या वरती भाविकांना दर्शन घडवले असून आज पुन्हा किमान २१ शे भाविकांना बुद्धगया( बिहार) येथे २२ डब्याच्या रेल्वेत पाठवत असून ३०० भाविक अष्टविनायक व ३०० भाविक पोहरादेवी येथे लक्झरी बसेसने पाठवत आहे . व पुढे ही पाठवत राहणार असून आजीची आणि आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी च तीर्थयात्रा घडवत असल्याची उदगार आमदार प्रशांत बंब यांनी काढले.

ते लासुर स्टेशन येथून बुद्ध गया दर्शनासाठी गंगापूर खुलताबाद तालुक्यातील बौद्ध बांधवांना घेऊन २२ डब्याची रेल्वे बुधवार (दि.२१)रवाना केली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वडील डॉक्टर बन्सीलाल बंब, आई सौ. कांचन बंब, मनीषा प्रशांत बंब, शितल बंब, संदेश बंब, निखिल पिपाडा, आनंद बंब, आगम बंब भन्ते चंद्रबोधी भन्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना ते म्हणाले आगामी काळात मतदार संघाचा आनंदाचा उच्चांक वाढवायचा आहे. शेतात आणि घरात राबराब राबणाऱ्या महिला भगिनींसाठी एक नवीन प्रयोग मतदारसंघात सुरू केला आहे. 30 ते 40 वयोगटातील महिला पुरुषांची जोडप्यांना सकाळी गावात गाडी पाठवून त्यांना दौलताबादचा किल्ला बीबीका मकबरा त्यानंतर सिनेमागृहात जाऊन घरगुती पिक्चर दाखवण्याचा व संध्याकाळी जोडीने सोबत जेवण करून पुन्हा आपापल्या घरी आणून सोडण्याचा मी प्रयोग सुरू केला आहे यामुळे आपल्या जोडीदाराला वेळ देता येत नाही असे म्हणणाऱ्यांना वेळ देता येईल व यामुळे माझ्या मतदारसंघात आनंदाचा (इंडेक्स ) उच्चांक वाढणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. दरम्यान यावेळी २२ डब्याची रेल्वे घेऊन जाणाऱ्या ड्रायव्हरचे तसेच गार्डचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. व रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शेषराव जाधव नंदकुमार गांधीले, अजय मुनोत यांच्यासह मित्र, कार्यकर्ते, भाजप पदाधिकारी, बौद्ध उपासक उपसिका नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.